रायगड - निसर्ग चक्रीवादळला आज एक महिना पूर्ण झाला. 3 जूनला आलेल्या चक्री वादळाच्या कटू आठवणी अजूनही नागरिकांच्या मनात दडलेल्या आहेत. महिन्यानंतर उद्ध्वस्त झालेला रायगड काही प्रमाणात सावरला आहे. शासनानेही रायगडकरांसाठी मदतीचा हात पुढे केला. बहुतांशी ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले आहेत मात्र, महिना झाला तरी शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तर श्रीवर्धन तालुक्यातील 70 टक्के वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.
निसर्ग चक्रीवादळाला एक महिना पूर्ण 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने रायगडला तडाखा दिला व क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. लाखो घरांचे नुकसान झाले, बागायतदार उद्ध्वस्त झाला, वीज पुरवठा खंडीत होऊन नागरिकांची वाताहत झाली. वादळा दरम्यान रस्त्यावर झाडांचा आणि उडून आलेल्या कौला-पत्र्याचा खच पडला होता. त्यामुळे हे रस्ते मोकळे करण्याचे प्रशासनासमोर आव्हान होते. जिल्हा प्रशासनाने तातडीने रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीतही केली.
वादळानंतर मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, नेतेमंडळी यांचे नुकसानग्रस्त भागात दौरे झाले. त्यानंतर शासनाने पावणे चारशे कोटी रुपयांचा निधी पाठवला. यातील 80 कोटी रुपये शेतीच्या नुकसान भरपाईसाठी वर्ग करण्यात आला. वादळानंतर प्रशासनाकडून तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. शासनाने पाठवलेल्या निधीचे वाटपही सुरू झाले. मात्र, अद्यापही अनेक नुकसनाग्रस्तांच्या खात्यात नुकसान भरपाई वर्ग झालेली नाही. बागायतदारांना तर अजून एक रुपयाही भरपाई मिळालेली नाही.
दरम्यान, नागरिकांच्या सात-बाऱ्यावर जास्त नावे असल्याने मदत वाटपात अडचणी येत असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. जिल्ह्यातील 80 टक्के भागात वीज आली असली तरी 20 टक्के भाग आजही अंधारात आहे. वादळ होऊन एक महिना पूर्ण झाला तरी नुकसानग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यात जिल्हा प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे.