रायगड -कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद पडल्याने गरीब सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच ओढाताण होत आहे. अशावेळी शासन, प्रशासन, सामाजिक संस्था यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अलिबाग तालुक्यातील दोन मित्रही स्वखर्च करून रोज गरजवंताना पाणी, धान्य, मास्कचे वाटप करत मदत करत आहेत. नवशीन पटेल आणि लवेश नाईक असे या जोडगळींची नावे असून त्यांनी आत्तापर्यंत 700 कुटुंबाना मदत पोहोचवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व कामधंदा बंद असून याचा सर्वाधिक फटका मोलमजुरी करणाऱ्या हातांना आणि सर्वसामान्य जनतेला बसला आहे. काम बंद असल्याने हातात पैसे नसल्याने अनेकांचे खाण्याचे हाल झाले आहेत. एकीकडे प्रशासन परराज्यातील मजूर, कामगार यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहेत. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील काही गरजवंत आजही मदतीविना उपेक्षित राहिले आहेत, अशा उपेक्षित असलेल्या गरजवंतांना नवशीन आणि लवेश हे स्वतः जाऊन मदत करत आहेत.