रायगड जिल्हा कारागृहातील दोन तुरुंग पोलीस निलंबित, अर्णबला जेलमध्ये मोबाईल दिल्याचा संशय - अर्णब गोस्वामी
आरोपींना मोबाईल दिल्याबाबत जिल्हा कारागृहातील दोन जेल पोलिसांनी निलंबित करण्यात आले आहे. अर्णब गोस्वामी यांनाही जेलमध्ये मोबाईल दिल्याचा संशय त्यांच्यावर आहे.
रायगड - न्यायालयीन कोठडीत अलिबाग शहरातील नगरपरिषद शाळेतील कोविड सेंटर मध्ये असताना अर्णब गोस्वामी यांना मोबाईल दिल्याचे प्रकरण 6 नोव्हेबर रोजी घडले होते. त्यानंतर जेल पोलिसांची चौकशी जिल्हा कारागृह अधीक्षकांनी सुरू केली होती. या चौकशीत सुभेदार डेरे आणि जेल पोलीस सचिन वाडे यांनी कैद्यांना मोबाईल पुरविल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र अर्णब गोस्वामी याला मोबाईल दिला नसल्याचे जिल्हा कारागृह अधीक्षक ए टी पाटील यांचे म्हणणे आहे. मात्र चौकशी अंती सगळा प्रकार बाहेर येण्याची शक्यता आहे.
अर्णब गोस्वामी मोबाईल प्रकरणाची सुरू होती चौकशी -
अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामीसह दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्यानुसार अर्णबसह नितेश आणि फिरोज यांना अलिबाग शहरातील नगरपरिषद एक नंबर शाळेत कैद्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी 6 नोव्हेबर रोजी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी मोबाईल दिल्याची घटना घडली होती. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले होते.
दोन तुरुंग पोलीस निलंबित -
जिल्हा कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांनी कोविड सेंटर मधून आलेले जिल्हा कारागृहातील कैद्यांना मोबाईल देण्याबाबत चौकशी केली. त्यावेळी जिल्हा कारागृहातील कैद्यांनी कोविड सेंटर जेलमध्ये तैनात असलेले सुभेदार डेरे आणि जेल पोलीस सचिन वाडे हे कैद्याकडून पैसे घेऊन मोबाईल देतात, अशी माहिती दिली. ए. टी. पाटील यांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी याबाबत कबुली दिली आहे. दोघांनी दिलेल्या कबुली नुसार वरिष्ठांकडे अहवाल पाठविल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र अर्णब गोस्वामी प्रकरणात त्यांना निलंबन केले नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.