रायगड- अलिबाग जवळच्या खानावमधील सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत आज वसुबारसनिमित्त गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. विशेष म्हणजे दोन गर्भवती गायींची ओटी भरणे कार्यक्रम करून डोहाळे जेवणही करण्यात आले. महिलांनी डोहाळे गीतही यानिमित्ताने सादर केले. जिल्ह्यातील गाभण गायींची ओटी भरणे आणि डोहाळे जेवण करण्याचा सोहळा पहिल्यांदाच झाला आहे.
वसुबारस दिवस : दोन गर्भवती गायींचे पार पडले डोहाळ जेवण सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजनवसुबारस निमित्ताने सहयोग गोपालन आणि संवर्धन मंडळातर्फे गोपूजन आणि ओटी भरण सोहळा खानाव याठिकाणी गोशाळेत ठेवण्यात आला होता. यानिमित्ताने संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेशपूजन, होमहवन करण्यात आले. ही गोशाळा खानाव येथे मागील 4 वर्षांपासून सुरू आहे. तेथे गीर जातीच्या 27 मोठ्या गायी, 1 वळू आणि 25 वासरे आहेत.दोन गाभण गायींची भरली गेली ओटीवसुबारस दिवस हा म्हणजे गायीचे पूजन करण्याचा दिवस. या दिवशी गोपूजन करून आपली संस्कृती जपली जाते. तसेच वसुबारस या दिवशी गर्भवती गायींची धर्मानुसार पूजा करावी, असे शास्त्र सांगत आहे. त्यादृष्टीने गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला. या गायींना फुलांनी सजवण्यात आले नंतर आरती करण्यात आली. उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, त्यांनी डोहाळेगीतही सादर केले. परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने सोहळ्यासाठी उपस्थित होते.पूर्वीच्या काळापासून गाय हेच धन मानले आहेऋषीमुनी काळापासून गाय हेच धन मानले आहे. गायींपासून उत्पादन मिळणाऱ्या वस्तू विकून चलन मिळायचे. ऋषीमुनिंकडे त्याकाळी हजारो गायी असायच्या. त्यामुळे गायीचे महत्व हे आजच्या काळात वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया गिरीष तुळपुळे, अध्यक्ष सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळ यांनी दिली.