रायगड - एखाद्या आजाराने व्यक्ती मरण पावल्यास नातेवाईक एकत्र येऊन त्याचे अंत्यसंस्कार करत असतात. मात्र, सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाला हात लावण्यास नातेवाईकही घाबरत आहेत. अशीच एक घटना रोहा येथे घडली असून दोन सेवाभावी तरुणांनी पुढाकार घेत कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार केले. आदित्य कोंडाळकर आणि राजेश काफरे अशी या तरुणांची नावे आहेत.
'त्या' दोघांनी केले कोरोनाबाधित मृत महिलेवर अंत्यसंस्कार
नागोठणे येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णालयाने महिलेच्या मुलाला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. अशा परिस्थितीत आदित्य कोंडाळकर आणि राजेश काफरे या दोन तरुणांनी त्या मुलाची मदत करत महिलेवर अंत्यसंस्कार केले.
नागोठणे येथील एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रोहा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर आरोग्य विभागामार्फत जवळच्या विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, रोहा शहरात असलेली विद्युतदाहिनी बंद असल्याने रुग्णालयाने मृत महिलेच्या मुलाला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. महिलेच्या मुलाकडे कोणतेही वाहन नसल्याने आपल्या मृत आईस कसे घेऊन जायचे, हा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे त्याची धावाधाव सुरू होती. मात्र कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे येत नव्हते.
रोहा शहरातील सेवाभावी कार्य करणारे आदित्य कोंडाळकर आणि राजेश काफरे यांना ही गोष्ट समजल्यावर तातडीने ते दोघे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी तत्काळ एका रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. स्वत: पीपीई किट परिधानकरून मृत महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून नागोठणे येथे घेऊन आले. त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेऊन महिलेचा मुलगा आणि दोन नातेवाइकांच्या सोबतीने अंत्यसंस्कार केले. आदित्य आणि राजेश या दोन तरुणांमुळे एका असहाय्य मुलाला आपल्या आईचे अंत्यसंस्कार करता आले. याअगोदरही आदित्यने एका कोरोनाबाधित एका वृद्ध महिलेला आणि अपंग मुलाला तिसऱ्या मजल्यावरून खांद्यावर उचलून आणत रुग्णवाहिकेत ठेवले होते. हे दोन तरुण खरे कोरोनायोद्धे असल्याची भावना महिलेच्या मुलाने व्यक्त केली.