रायगड - कोरोनाच्या संकटात चोरट्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. खोपोली पेण रस्त्यावर गोरठण बुद्रुक गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्याने फोडून 29 लाख 1 हजार 800 रुपये लंपास केले आहेत. सुदैवाने दुसरे एटीएम चोरट्यांना फोडता न आल्याने बँकेचे 35 लाख रुपये सुरक्षित राहिले. विशेष म्हणजे, बँकेच्या बाजूला असलेल्या वावोशी येथे पोलीस स्टेशन आहे.
रायगड : पोलीस स्टेशनजवळील एटीएम फोडून 29 लाख चोरट्यांकडून लंपास
एकीकडे, नागरिक कोरोनाच्या संकटात जीव मुठीत धरून जगत आहेत. अशा महामारीच्या संकटात चोरट्यांनी एटीएम फोडून गोर-गरीबांच्या पैशावर डल्ला मारला आहे.
खालापूर तालुक्यातील खोपोली पेण रस्त्यावर गोरठण बुद्रुक या ठिकाणी भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. बँकेच्या आवारात दोन एटीएम आहेत. अज्ञात चोरट्यानी 24 सप्टेंबरला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश केला. कटर मशीनच्या साहाय्याने चोरट्याने एटीएम फोडले. त्यातून 29 लाख 1 हजार 800 रुपये एवढी रक्कम काढली. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या एटीएमकडे आपला मोर्चा वळवला. मात्र दुसरे एटीएम फोडण्यात चोरट्यांना अपयश आले. चोरट्यांनी 29 लाख रुपये घेऊन पोबारा केला.
सकाळी बँक सुरू झाल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. बँकेच्या व्यवस्थापकांनी त्वरित खालापूर पोलीस स्टेशनला कळविले. खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेतील सीसीटीव्हीच्या माध्यमातून खालापूर पोलीस चोरीचा तपास करीत आहेत.