खालापूर ( रायगड ) - सतत चर्चेत व अत्यंत संवेदनशील असलेल्या खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू झाले. यासाठी साडेचार कोटी निधी खर्च आहे. एमएमआरडीए निधी व खोपोली नगरपालिका यांच्या माध्यमातून हा रस्ता नूतनीकरण होत आहे. दोन्ही बाजूंनी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र पावसाच्या तोंडावर ठेकेदाराकडून काम बंद झाले आहे. चिखल व खोदकाम झाल्याने अरुंद रस्त्यावरून जाताना वाहने पलटी होऊन दररोज अपघात घडत असून 9 जून रोजी सकाळी एक ट्रक पलटी झाल्याचे पाहायला मिळाले.
ताकई रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे ट्रक पलटी - Raigad Truck overturned news
ताकई रस्त्यावर चिखल व खोदकाम झाल्याने अरुंद रस्त्यावरून जाताना वाहने पलटी होऊन दररोज अपघात घडत असून 9 जून रोजी सकाळी एक ट्रक पलटी झाल्याचे पाहायला मिळाले.
ठेकेदाराने काम ठेवले बंद
साडेचार कोटी खर्च होऊन नूतनीकरण होत असलेल्या या रस्त्याचे काम सहा महिन्यांच्या आत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र दोन महिन्यात फक्त खोदकाम होऊन ठेकेदार कडून काम बंद करण्यात आले आहे.
खड्ड्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता
संपूर्ण रस्ता चिखल, खड्डेमुळे धोकादायक बनला आहे. दरम्यान रस्ता रुंदीकरणसाठी आवश्यक जागा देण्यात तांत्रिक अडचणी व जागा मालकांचा विरोध होत असल्याने रस्त्याचे काम वादात सापडले आहे. याबाबत लवकरात लवकर तोडगा निघण्यासाठी येथील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व नेते नगरपालिका व जागा मालक बरोबर चर्चा करीत आहेत. मात्र अद्याप कोणताही तोडगा मान्य होत नसल्याने ठेकेदाराकडून काम बंद ठेवण्यात आले असल्याचे नगरपालिकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे जनतेचे धोकादायक रस्त्यावरून प्रवास करताना मात्र हाल सुरू आहेत.