पेण (रायगड):अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, इको कार क्रमांक (एमएच-46-ए-1003) मधून बाळूमामाच्या यात्रेसाठी कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते. तर ट्रक क्रमांक (एमएच-43-बीजी-3234 ) हा खोपोलीहून पेणकडे येत होता. पेण पूर्व विभागातील वाक्रुळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरा-समोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यामध्ये इकोकार मधून प्रवास करणारे विक्रम गोविंदराव दिंडे (वय 50), नागेश विक्रम दिंडे (वय 27 वर्षे, चालक) आणि प्राजक्ता नागेश दिंडे (वय 25 वर्षे) हे जागीच ठार झाले. तर याच कारमधील गजानन चंदन वडगावकर (वय13), विकी विठ्ठल श्रीरामे (वय 15), मीनाक्षी विक्रम दिंडे ( वय 22), कविता विक्रम दिंडे (वय 45) हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना रुग्णालयात केले दाखल:अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी, युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर अपघातग्रस्तांचे मदतगार देवदूत कल्पेश ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत अपघातग्रस्तांना मदत करीत स्वतःच्या रुग्णवाहिकेतून जखमींना पेणमधील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल केले. यामुळे तीन जखमींचे प्राण वाचू शकले. वृत्त समजताच वाक्रुळ येथे राहणारे माजी आमदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.
दिंडे परिवारावर संकट: या अपघातातील दिंडे परिवार हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. दरवर्षी ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळुमामाच्या यात्रेसाठी जात असतात. यंदाही यात्रेसाठी निघाले असतानाच त्यांच्या परिवारावर हे मोठे संकट कोसळले. अपघाताचे वृत्त पेण फणसडोंगरी परिसरात पोहोचताच दिंडे परिवाराशी संबंधितांनी शोक प्रकट केला.
वाहतुक कोंडी हटविली: या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्याला करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत. या अपघातामुळे पेण-खोपोली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरू झाली. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक आपटा-रसायनी-पनवेल मार्गे वळविण्यात आली होती.
दुकानात शिरली भरधाव कार:औरंगाबाद जिल्ह्यातीलगंगापूर तालुक्यातील वसु सायगाव येथे नागपूर मुंबई मार्गावर असलेल्या फरसाणच्या दुकानात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भरधाव कार क्रमांक mh 12 kj 1510 दुकानात शिरली. या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातात तीन दुचाकीचाही चुराडा झाला आहे.