रायगड - आज देशभरात 'कारगिल विजय दिन' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आज कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी गावातील सुपुत्र निलेश तुणतुणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच राज्य सरकारतर्फे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 'उरी - दि सर्जिकल स्ट्राईक' हा युद्धपट मोफत दाखविण्यात आला.
कारगिल विजय दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमाचा मोफत शो अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी गावातील सुपुत्र निलेश तुणतुणे हे सैन्यात गन मास्टर या पदावर रुजू होते. तर १९९८ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरू झाले होते. त्यामुळे ते बारामुल्ला, श्रीनगर, काश्मीर परिसरात युद्धात सहभागी झाले. यावेळी पाकिस्तानच्या सैन्याच्या हल्ल्यात १ ऑगस्ट १९९८ रोजी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या स्मरणार्थ सहाणगोठी या मूळ गावी हुतात्मा निलेश तुणतुणे यांचे स्मारक बांधण्यात आले.
तर आज कारगिल विजय दिनाच्यानिमित्त सहाणगोठी येथे हुतात्मा निलेश तुणतुणे यांच्या स्मृतीस अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार व तहसीलदार सचिन शेजाळ यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच यानिमित्ताने हुतात्मा निलेश तुणतुणे यांची आई निर्मला तुणतुणे, वडील नारायण तुणतुणे व कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.
कारगिल विजय दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अनुभवला युद्धपटाचा थरार
युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना व अभिमान वृद्धींगत व्हावा, यासाठी आज राज्य सरकारतर्फे १८ ते २५ वयोगटातील युवकांना 'उरी - दि सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा दाखविण्यात आला. राजगड जिल्ह्यातील १० सिनेमागृहात २ हजार ९३८ तरुणांना हा सिनेमा दाखविण्यात आला. तर अलिबागमधील महेश टॉकीजमध्ये शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सिनेमा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.