रायगड - म्हशीच्या गोठ्यातील शेण-मुत्र नाल्यातून पाझरत विहिरीत जात असल्याने दूषित पाणी पिऊन खालापूर तालुक्यातील विणेगाव आदिवासी वाड्यामधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार कलोते ग्रामपंचायतीला सांगूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर आदिवासी वाड्यातील महिलांनी थेट खालापूर पोलीस ठाणे व पंचायत समिती कार्यालय गाठत गोठा मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया नागरिकांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ -
या विहीरीच्या बाजूला काही अंतरावर कदम नावाच्या व्यक्तीचा म्हशीचा गोठा आहे. या गोठ्यातील गाई म्हशीच्या मूत्र आणि शेणखळीचे पाणी शेजारील ओढ्यात सोडले जाते. या ओढ्यातील पाणी पाझरुन विहिरित जात असल्याने विहिरीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. त्यामुळे पाण्याला अतिशय घाण वास येत असून येथील नागरिकांवर टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुलांना तसेच वाडीतील ग्रामस्थांना सर्दी, खोकला, घसादुखी यासारखे आजार उद्भवू लागले आहेत.
90 कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न -
कलोते ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विणेगाव येथील दांडवाडी, कातळाची वाडी व आंबेवाडी या तीन आदिवासीवाडींकरिता प्रशासनाने विहीर बांधून दिली. या तीन आदिवासी वाड्यातीस जवळपास 90 कुटुंब या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि दैनंदिन कामासाठी करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या विहिरी शेजारी असलेल्या गोठ्याचे दूषित पाणी विहिरीत जात असल्याने 90 कुटूंबांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गोठा मालकावर कारवाईची मागणी -
या परिसरातील आदिवासी नागरिक या प्रकाराने संतप्त झाले आहेत. अखेर त्यांच्या या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने विणेगावचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाडिक यांच्या मदतीने कातळवाडीतील महिला एकवटल्या आहेत. महिलांनी खालापूर पोलीस ठाणे व पंचायत समिती कार्यालयावर धडकून लेखी तक्रार अर्ज देत गोठा मालकावर कारवाईची मागणी केली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महाडिक यांनी दिला आहे.
हेही वाचा - चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले