रायगड- निसर्ग चक्रीवादळाचा कोकणातील जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला. या वादळामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडून या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करत आहेत. मात्र, आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांच्या झोपडी, घराच्या झालेल्या दुर्दशेकडे पाहण्यासाठी अद्याप कोणीही आलेले नाही. अलिबाग तालुक्यातील किहीम आणि नारंगी चिंचवली आदिवासी वाडीवर वादळाने घरांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे. पावसाळा सुरू झाल्याने या आदीवासींना पावसात भिजत राहावे लागत आहे.
निसर्ग चक्रीवादळाने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, तळा, म्हसळा या तालुक्याला अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. लाखो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अलिबाग तालुक्यातील डोंगर भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडीवर राहणाऱ्या वयोवृद्ध चंद्रा नाईक यांच्या घरासह परिसरातील इतर घरांचे छप्पर वादळात उडाले आहे. चंद्रा नाईक यांच्या घरात त्या मतिमंद मुलगा दोघेच राहत आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने हातात पैसा नाही. त्यात चक्रीवादळाने डोक्यावरील छप्परही उडाल्याने पावसात भिजत राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.