महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : अखेर पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत - pali gram panchayat news

पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्याची अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काढली असून अखेर पाली ग्रामपंचायत आता नगरपंचायत म्हणून उदयास येणार आहे. तसेच पाली नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून पाली तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

transformation of pali gram panchayat into nagar panchayat in raigad
पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत; नगरविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर

By

Published : Jan 1, 2021, 4:43 PM IST

रायगड -जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्याची अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज काढली आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. अखेर पाली ग्रामपंचायत आता नगरपंचायत म्हणून उदयास येणार आहे. त्यामुळे पालीच्या विकासाला चालना मिळणार आहे. पाली नगरपंचायत होत असल्याने पालीकरांनी आनंद व्यक्त केला आहे. पाली नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून पाली तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पाली ग्रामपंचायत झाली नगरपंचायत -

सुधागड तालुक्यातील पाली हे महत्त्वाचे गाव आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेले बल्लाळेश्वर गणरायाचे ठिकाण हे पाली येथे आहे. त्यामुळे पाली गावाला एक धार्मिक महत्त्वही आहे. पाली ग्रामपंचायत हद्दीत 17 हजार लोकसंख्या आहे. ग्रामपंचायतीचे सहा प्रभाग असून 17 सदस्य संख्या आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत व्हावे, अशी मागणी येथील जनतेने केली होती. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागाने नगरपंचायत होण्याची अधिसूचना जाहीर केली आहे.

नगरपंचायतीला आधी होता विरोध -

म्हसळा, तळा, पोलादपूर, खालापूर, माणगाव या नगरपंचायती झाल्या तेव्हा पालीचीही नगरपंचायत करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यावेळी काही राजकीय पुढाऱ्यांनी याला आक्षेप घेतल्याने हे प्रकरण न्यायलायत गेले होते. त्यामुळे पाली ग्रामपंचायत ही नगरपंचायत होण्यापासून राहिली होती. मात्र, पुन्हा एकदा पाली नगरपंचायत होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला असल्याने अखेर त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.

नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावणार नाहीत -

पाली नगरपंचायत निवडणुका होईपर्यंत प्रशासक म्हणून अधिक चांगले काम करणार आहे. नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. त्यांची सर्व प्रकारची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड व प्रशासक, पाली ग्रामपंचायत यांनी दिली आहे.

नगरपंचायत झाल्याचा आनंदच -

सुरुवातीसा नगरपंचायत जाहीर झाल्यावर नगरपंचायतीचे स्वागत केले होते. मात्र, तत्कालीन पक्षश्रेष्ठींनी मतांच्या राजकारणासाठी नगरपंचायत होऊ नये, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्याला नाईलाजाने पाठिंबा द्यावा लागला. मात्र, आता नगरपंचायत होणार असल्याचे समाधान वाटत आहे. तसेच नगरपंचायत व्हावी, यासाठी स्वतः मंत्रालय स्तरावर कागदपत्रे दिली होती, अशी प्रतिक्रिया भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी दिली आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये नूतन वर्षाच स्वागत वाहन तोडफोडीने; 13 जण ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details