रायगड - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी गावी निघाले असून या चाकरमान्यांना सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. खड्डेमय रस्त्याचा सामना करत मार्गस्थ झालेल्या कोकणकरांना वडपाले येथे झालेल्या अपघातामुळे आणखी उशीर लागणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पेण ते वडखळ, इंदापूर, माणगाव, लोणारे या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे या महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उद्या 2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने दोन दिवसांपासून कोकणात जाणारे चाकरमानी गावी निघाले आहेत. त्यात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याने व एसटी बसचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमानी स्वतःच्या वा भाड्याच्या वाहनांनी गावी निघाले आहेत. मात्र, मुंबई-गोवा महामार्गही मोकळा नसल्याने चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्याने डुलतडुलत संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे वाहतूक कोंडीने हाल झाले आहेत.