रायगड -अलिबागचा गुणकारी, औषधी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग वडखळ रस्त्यावर शेतकरी पांढरा कांदा विक्रीस करण्यास आता दिसू लागले आहेत. अलिबागकडे येणारे पर्यटकही आवर्जून हा पांढरा कांदा खरेदी करीत आहेत. त्यामुळे अलिबागच्या कांद्याची चव ही राज्यभर पोहोचू लागली आहे. यावर्षी 7 ते 8 टन पांढरा कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे.
खंडाळा, कार्ला, नेहुली आहे पांढऱ्या कांद्याचे हब
अलिबाग हा पांढरा कांदा उत्पादन घेणारा तालुका आहे. तालुक्यातील खंडाळा, नेहुली, कार्ला या गावात शेतकरी मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याची शेती करीत असतात. त्यामुळे हा परिसर पांढऱ्या कांद्याचे हब बनले आहे. पांढरा कांदा हा गुणकारी आणि औषधी असल्याने त्याला जास्त मागणी आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मानांकन मिळण्यासाठीही शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
गेल्यावर्षी बसला होता कोरोनाचा फटका
भात शेती कापणी झाल्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यात पांढरा कांद्याची शेती केली जाते. साधारण फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून पांढरा कांद्याचे उत्पादन निघण्यास सुरुवात होते. गेल्यावर्षी 2020साली मार्च महिन्यापासून कोरोनासंकट देशात सुरू झाले. त्यानंतर राज्यात संचारबंदी लागली. पांढरा कांदा पीक विक्रीस तयार झाले असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्यावर्षी आर्थिक फटका सहन करावा लागला होता.
अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात, 180 ते 200 रुपये माळ
पांढरा कांदा शेतकऱ्यांनी शेतातून काढला असून तो आता बाजारात विक्रीस येऊ लागला आहे. शेतकरी रस्त्यावर पांढरा कांदा विकताना दिसू लागले आहेत. छोटा 180 तर मोठा पांढऱ्या कांद्याची माळ ही 200 रुपयांपर्यंत विकत मिळत आहे. संचारबंदीत शासनाने शिथिलता दिली असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागमध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे माघारी जाताना पांढरा कांदा खरेदी करून घेऊन जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ लागला आहे.
223 हेक्टरवर केली कांद्याची लागवड, गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 हेक्टर क्षेत्र झाले कमी
अलिबागमध्ये 223.05 हेक्टर क्षेत्रावर पांढरा कांद्याची लागवड करण्यात आली होती. यातून 7 ते 8 टन उतपादन घेण्यात आले. गेल्यावर्षी 232 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली होती. मात्र यावर्षी 11 हेक्टर क्षेत्र लागवडीचे कमी झाले आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. पांढरा कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारातही ओळख मिळणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.