रायगड - नववर्षाच्या स्वागताला रायगड जिल्ह्यात पर्यटकांचे आगमन झाले असून समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. समुद्रकिनारी पर्यटक मौजमजा करताना पाहायला मिळत आहेत. आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक व्यवसायिकांना भरभराटीचे दिवस आले आहेत. पर्यटकांची आणि वाहनांची वाढती संख्या पाहता स्थानिक आणि जिल्हा पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये पर्यटकांची गर्दी
31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्याला पसंती देत आहेत. 31 डिसेंबर (मंगळवार) कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्याने शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीच अनेकजण नववर्ष साजरे करण्यासाठी आले आहेत.
हेही वाचा - अलिबागमध्ये रंगणार 'शोध मराठी मनाचा' साहित्य संमेलन
जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल झाले असून घोडा, उंट सफारी, बोटिंग, केटीएम रायडिंगचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. कुलाबा किल्ल्यालाही पर्यटक भेट देत आहेत. वाहनांची संख्याही वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. जिल्हा वाहतूक पोलिसही वाहनांची कोंडी सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. स्थानिक प्रशासनानेही समुद्र किनारी जीवरक्षक तैनात केलेले आहेत. पोलिसांनी पर्यटन स्थळांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेसही हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांचा व्यवसाय तेजीत आला आहे. मटण, चिकन, मासे बाजार, मद्याच्या दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे.