रायगड- उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर येत असल्याचे दिसत आहे. पर्यटक पर्यटनासाठी आले असल्याने समुद्र किनारे तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉजेस हाऊसफुल झालेली आहेत. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यत समुद्रात चिंब भिजण्याचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत.
उन्हाळी सुट्टीमुळे रायगडातील समुद्र किनारे पर्यटकांनी 'हाऊसफुल्ल' मुलांच्या परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागलेली आहे. त्यामुळे पालकवर्ग पर्यटनाचे बेत आखत आहेत. पर्यटक हे पर्यटनासाठी पहिली पसंती रायगडला देत असल्याने जिल्ह्यात सध्या पर्यटकांचा राबता दिसत आहे.
जिल्ह्यात अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, काशीद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या समुद्र किनारी पर्यटक आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची जत्रा भरलेली दिसत आहे. समुद्र किनारी असलेले घोडा गाडी, उंट सफारी, बोटिंग, पॅराग्लायडिंग, लहान मुलांच्या गाड्या याचा आस्वाद पर्यटक घेताना दिसत आहेत. तर बच्चे कंपनी वाळूत तसेच समुद्राच्या पाण्याचा आस्वाद घेत आहेत.
समुद्र किनाऱ्याबरोबर रायगड किल्ला तसेच ऐतिहासिक मंदिरे, किल्ले याठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने आलेले आहेत. पर्यटक जिल्ह्यात आले असल्याने हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेस फुल्ल झाली आहेत. तर अनेकांनी आधीच सुट्टीचा बेत आखल्याने हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेस बुक केले होते.
सुट्टीत पर्यटक समुद्राचा आनंद घेत असताना येथील माशांवरही ताव मारत आहेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांना, हॉटेल व्यावसायिक, समुद्र किनाऱ्यावरील बोटिंग, घोडे व्यावसायिक यांचे धंदेही तेजीत आहेत.