नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि रायगड ग्रामीणमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी 6 रूग्णांची वाढ झाली. यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 38वर पोहोचला आहे. आत्तापर्यंत पनवेल महानगरपालिकाहद्दीत 31, उलवे परिसरात 4, उरणमध्ये 2 आणि श्रीवर्धन तालुक्यात 1 रुग्ण आढळला आहे.
आत्तापर्यंत येथे 386 जणांची कोरोना चाचणी केली असून, यापैकी 321 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 27 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 31 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात 11 जण हे सीआयएसएफचे जवान आहेत. जिल्ह्यात एका कोरोना बधिताचा मृत्यू झाला असून, 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करताना सद्यस्थितीत खारघरमधील ग्रामविकास भवनमध्ये 21 जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात 24 आणि एमजीएम रुग्णालयात 16 रुग्ण ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तीन रुग्ण असून, यातील एक व्यक्ती ही रेशनचे दुकान आणि पिठाची गिरणी चालवत होती. उर्वरित दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ओला कॅब ड्रायव्हरच्या संपर्कातील असून, यात ओला कॅब ड्रायव्हरच्या पत्नीचाही समावेश आहे.
काळूंद्रे गावात जी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आहे ती मेडिकल डिस्ट्रीब्यूटर असून, मुंबईतील भांडूप येथे दररोज ये-जा करत होती. कामोठे येथील सेक्टर 34 मध्येही एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. याव्यतिरिक्त श्रीवर्धन तालुक्यात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तो मुंबईतून त्याच्या श्रीवर्धन या गावी गेला होता.
दरम्यान, रुग्णांची संख्या वाढत असल्याने अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या व्यक्ती वगळता कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. जे बाहेर पडतील त्यांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.