महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, अवधूत तटकरे आज बांधणार शिवबंधन - अवधूत तटकरे शिवसेनेत

रायगडमध्येही राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

अवधूत तटकरे आज बांधणार शिवबंधन

By

Published : Sep 9, 2019, 11:57 AM IST

रायगड - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले आहे. काही केल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील गळती थांबण्यास तयार नाही. आता रायगडमध्येही राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

अवधूत तटकरे हे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे असल्याने पक्षाला तसेच तटकरे यांना हा जबरी धक्का आहे. मात्र, अवधूत तटकरे हे श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार असले तरी आमदारकी काळात त्यांना आपला प्रभाव या मतदारसंघात टाकता आलेला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने त्याचा फायदा पक्षाला किती होणार हा प्रश्नच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार अवधूत तटकरे, वडील माजी आमदार अनिल तटकरे व भाऊ संदीप तटकरे यांनी आठवडापूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. याआधीही दोन वर्षांपूर्वी अवधूत तटकरे हे पक्ष सोडणार असे वातावरण तयार झाले होते.

रोहा नगरपालिका निवडणुकीत अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप तटकरे यांनी शिवसेनेसोबत जाऊन अपक्ष म्हणून नगराध्यक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हापासून तटकरे बंधू हे शिवसेना पक्षासोबत होते. खासदार सुनील तटकरे व बंधू अनिल तटकरे यांच्यात घरगुती कलह असल्याचे जिल्ह्याला माहीत आहे. अवधूत तटकरे हे पक्ष सोडणार नाही असे सुनील तटकरे यांनी सांगितले होते. मात्र, अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला असून आज ते मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

आमदार अवधूत तटकरे यांच्यासोबत अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण कोण पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार याबाबत कळलेले नाही. मात्र, अवधूत तटकरे यांच्या प्रवेशाने शिवसेनेला याचा किती फायदा होणार हा प्रश्नच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details