पनवेल- शाळेचा पहिला दिवस पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुतुहलचा दिवस ठरतो. मात्र, पनवेलच्या कळंबोलीत सुधागड हायस्कुलच्या समोरील मैदानात बॉम्ब आढळून आल्याने पनवेल शहरात एकच खळबळ माजली होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका हातगाडीवर टायम लावलेला बॉम्ब आढल्यानंतर कळंबोली पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. ही संशयित वस्तू बॉम्बच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बॉम्ब निकामी करण्यात आला आहे.
सुधागड शाळेच्या समोर असलेल्या स्मृती पार्कमध्ये उभ्या असलेल्या एका हातगाडीवर एका बॉक्समध्ये लाल रंगाचा डब्बा ठेवण्यात आला होता. या डब्बात एक बॅटरी होती आणि ती एका घड्याळासोबत जोडली होती. हे पाहून तिथल्याच एका सुरक्षारक्षकाने ही माहिती कळंबोली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार कळंबोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.