महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहतुकीच्या समस्येवर उरणकरांच्या उपोषणाचा तिसरा दिवस; प्रशासनाकडून प्रतिसाद नाहीच - TRAFFIC PROBLEM IN URAN

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने उरणमध्ये वाहतुकीच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी उपोषण केले जात आहे. विविध मागण्यांसाठी संघटनेचे अजित म्हात्रे यांनी पुढाकार घेत हे उपोषण सुरू केले आहे.

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संघटना

By

Published : Nov 20, 2019, 8:23 PM IST

रायगड- उरणमध्ये सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे उरणकारांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने याविरोधात आवाज उठवण्यासाठी आगरी-कोळी-कराडी संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. मात्र, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संघटनेचे उपोषणकर्ते
उरणमध्ये पार्किंग समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. अपघातही मोठ्या संख्येने होत असून अनेकांना यात जीव गमवावे लागले आहेत. पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित शासकीय विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर वेळीच उपाययोजना व्हावी, यासाठी दिघोडे येथे आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संघटनेचे अजित म्हात्रे यांनी उपोषण सुरू केले आहे. दास्तान ते दिघोडे या एकेरी मार्गावरील अवजड वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी. दास्तान फाटा ते दिघोडे या मार्गाची दुरुस्ती करावी. गव्हाण फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते करळ फाटा या मार्गावरील अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग बंद करून ठराविक वेळेत अवजड वाहतूक बंद व्हावी. अशा प्रमुख मागण्यांसाठी अजित म्हात्रे यांनी उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणास स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटना, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, प्रकल्पग्रस्त आठ गाव बैलोडखार सामाजिक संस्था, शिवक्रांती मावळा संघटना, ज्येष्ठ नागरिक सामाजिक संघटना दादरपाडा, उरण सामाजिक संस्था आदी विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. सर्वात विशेष बाब म्हणजे प्रशासनाकडून अद्याप प्रतिसाद तर मिळालेला नाहीच, पण उपोषण सुरू असताना उपोषणकर्त्यांच्या समोरूनच अवजड वाहनांची वाहतूक दिमाखात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details