रायगड - पेण शहरात सध्या चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. चोरट्यांनी एसबीआय बँकेची दोन एटीएम फोडून त्यातील लाखोंची रोख रक्कम लांबवली आहे. पेण-खोपोली रस्त्यावर असलेल्या सनसिटी इमारतीमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम फोडून हात साफ केला आहे.
चोरट्यानी चोरी केल्यानंतर गॅस कटर तिथेच टाकून पोबारा केला. याबाबत पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. सोमवारी सकाळी ही घटना समोर आली. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक बनवले आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी तरणखोप येथील बंगला व एका रात्रीत 14 दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच आता चक्क चोरट्यांनी मध्यरात्री शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारतीमधील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमवर धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी 56 लाख 34 हजार 800 रुपये लंपास केले आहेत. सदर दरोड्याची घटना घडल्याने चोरांनी पेण पोलिसांना सरळ सरळ आव्हानच दिल्याचे बोलले जात आहे. दरोड्याची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाकरिता फॉरेन्सिक पथकही पाचारण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे.
मागील महिन्यात तरणखोप येथेही राहत्या घरात दागिन्यांसह लाखो रुपयांची चोरीची घटना घडली होती. तसेच पेण शहरातील मुख्य मार्गावरील चौदा दुकाने चोरांनी एकाच रात्रीत फोडून चोऱ्या केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी आठ दुकानदारांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती. सदरची घटना ताजी असतानाच चक्क आज पहाटे शहरातील सनासिटी बिल्डिंग मधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य रस्त्यावरील एटीएम दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 56 लाख 34 हजार 800 रुपयांची रोकड लंपास केली. या दरोडेखोरांनी स्वतःबरोबर आणलेला गॅस कटर व सिलेंडर एटीएम मध्येच टाकून पलायन केले. पेण शहरात एका मागोमाग एक अश्या अनेक चोरीच्या घटना होत असल्याने चोरांनी व दरोडेखोरांनी पेण पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
स्टेट बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा -
एटीएम वर पडलेल्या दरोड्या मुळे बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. या एटीएमला बँक अधिकाऱ्यांनी साधा सीसीटीव्ही कॅमेराही लावला नव्हता. तसेच रात्रीच्या वेळी एटीएम वर सुरक्षा रक्षकही नेमला नव्हता. नेमका याच गोष्टीचा दरोडेखोरांनी फायदा घेतला असावा. कर्तव्यात कसूर करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण शाखेतील अधिकाऱ्यांवर बँक प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
घटना उघडकीस आणण्यासाठी DB टीमची स्थापना -
पेण परिसरात घडणाऱ्या घटना उघडकीस आणण्यासाठी पेण पोलिसांनी डिटेक्शन ब्रँच (DB टीमची) स्थापना केली आहे. मात्र ही टीम कार्यरत असताना सुद्धा व्यापाऱ्यांची फसवणूक, घरांवर दरोडे, बाजारपेठेतील 14 दुकानांवर धाडसी चोऱ्या झालेल्या असताना त्या अजून पर्यंत उघडकीस न आल्याने पुन्हा एकदा या चोरट्यांनी चक्क स्टेट बँकेचा ATM फोडून आपली हुशारी सिद्ध केली असल्याने पेण पोलिसांची (गुन्हे प्रकटीकरण शाखा पेण) DB टीम काय करत आहे? अशी चर्चा पेणच्या जनतेत सुरू आहे.