रायगड - कर्जत शहरातील मुद्रे बुद्रुक गावात घरफोडीची घटना घडली आहे. घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल मिळून 1 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या आरोपीला कर्जत पोलिसांनी शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या. त्याच्या साथीदारालाही मुद्देमलासह अटक केली आहे.
13 ऑक्टोबर 2021 रोजी मुद्रे बुद्रुक गावातील महसूल वसाहतीत राहणारे रंजित धोंडिबा चव्हाण हे आपल्या कुटुंबीयांसह घर बंद करून बाहेर गेले असता कुलूप तोडून एका चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटातील सोन्याचे दागिने व चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल लंपास केला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल व तांत्रिक पुराव्यांची मदत घेऊन या गुन्ह्यातील साक्षीदारांच्या मार्फत मुख्य आरोपी शफीक अब्दुल शेख ( वय - 40 ) रा. घुंगट नगर, भिवंडी, जिल्हा ठाणे यास भिवंडी येथून ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले.
घरफोड्या करणाऱ्या अट्टल आरोपीला कर्जत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
घरफोडी करून सोन्याचे दागिने, मोबाईल मिळून 1 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना कर्जतमधील मुद्रे बुद्रुक गावात घडली आहे. मुख्य आरोपी शफीक अब्दुल शेख ( वय - 40 ) रा. घुंगट नगर, भिवंडी, जिल्हा ठाणे यास भिवंडी येथून ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले.
शफीक यांच्याकडे चौकशी केली असता त्याने एकट्याने हा गुन्हा केला असल्याचे कबूल करून चोरले दागिने त्याचा साथीदार मित्र लवकुश पापाजी गुप्ता ( वय - 31 ) न्यु बालाजी नगर, अंबरनाथ यांच्याकडे विकण्यासाठी दिले होते. या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करून शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यास पोलिसांना यश आले. शफीक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर रबाळे, भिवंडी, ठाणे येथे एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे दाखल असून दुसरा लवकुश गुप्ता याच्यावर तीन चोरीचे गुन्हे असल्याची माहिती मिळत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, डीवायएसपी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश धोंडे, पोलीस हवालदार सुभाष पाटील, स्वप्नील येरूणकर, भूषण चौधरी, गणेश पाटील, अश्रुबा बेंद्रे यांनी केली. तर नागरिकांनी दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाताना आपल्या घरातील मूल्यवान वस्तू त्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने हे घरामध्ये न ठेवता कोठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवावेत अथवा आपल्या सोबत घेऊन जावेत, असे आवाहन कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.