रायगड - महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नाही. आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्य म्हणून जो निर्णय घेतील तो अंतिम असतो, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. कोरोना काळात महाविकास आघाडी ज्या पद्धतीने काम करत आहे, हे सर्वांना माहिती आहे, जनता खुळी नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी भाजपवर केली आहे. तसेच रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने नऊ अर्बन हेल्थ सेंटर उभारणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा -पोलीस निरीक्षकाचा महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार
श्रीवर्धन नगरपरिषद पाणी पुरवठा योजना आणि समुद्रकिनारा सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. श्रीवर्धन प्रशासकीय भवनात कोरोना प्रतिबंधत्मक उपाययोजना आणि तौक्ते चक्रीवादळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना उपाययोजना, मराठा आरक्षण, म्यूकरमायकोसिस याबाबत माहिती दिली. पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते.
- ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकचे ऑडिट करा -
राज्यात पाच वर्षात चार चक्रीवादळं आली. यामुळे कोकणासह इतर जिल्ह्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला होता. चक्रीवादळ येण्याआधीच नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याबाबत वास्तूविशारद यांना सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने ऑक्सिजन, फायर, इलेक्ट्रिकचे ऑडिट करून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी केल्या आहेत.
- आघाडी सरकार निधी कमी पडू देणार नाही -
कोरोनाचे संकट 14 महिन्यापासून आहे. या काळात काही प्रमाणात राज्याचे उत्पन्न घटले असले तरी या संकटाचा मुकाबला करण्यासोबतच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. आखाती देशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याबाबत सूचना अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी दिल्या आहेत.
- जिल्ह्यात नऊ अर्बन हेल्थ सेंटर उभारणार
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात 9 अर्बन हेल्थ सेंटर उभारले जाणार आहेत. पनवेलमध्ये सिडकोचे, पेणमध्ये जेएसडब्लू तर रोहा येथे रिलायन्सचे जम्बो रुग्णालय कोविडं सेंटर केले जाणार आहेत. महाडचे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय बनवणार आहे. माणगाव येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार असून, रोहा येथे 100 बेडचे रुग्णालय तर महिलांसाठी 100 बेडचे रुग्णालय उभारले जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. म्यूकरमायकोसिस रुग्णांवर शासकीय रुग्णालयात तर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गतही मोफत उपचार केले जाणार आहेत. ज्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत त्यांना कमाल पाच लाख रुपयांपर्यत खर्च मर्यादित करण्याचे निर्देश दिले असल्याचे टोपे यांनी संगितले.
हेही वाचा -'सायकल गर्ल'च्या शिक्षणाचा खर्च काँग्रेस उचलणार; प्रियंका गांधींनी ज्योतीशी फोनवरून साधला संवाद