रायगड - टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर पर्यटनालाही शासनाने परवानगी दिली. समुद्र पर्यटन पुन्हा जोमाने सुरू झाले. मात्र जलक्रीडा व्यवसायिक एमएमबीच्या कागदोपत्री परवानगीच्या कात्रीत अडकले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र एमएमबीकडून परवानगी मिळत नसल्याने जलक्रीडा व्यवसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यवसायिकांनी अलिबाग एमएमबी अधिकाऱ्यांना घेराव घालून, व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागितली.
10 महिन्यापासून जलक्रीडा व्यवसाय बंद
मार्च महिन्यापासून कोरोना महामारी सुरू झाली आणि शासनाने समुद्रकिनारे पर्यटनास बंद केले. त्याचा मोठा फटका हा जलक्रीडा व्यवसायिकांना बसला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हळूहळू शासनाने व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली. यामध्ये समुद्र पर्यटनही खुले केले. शासनाने पर्यटनास परवानगी दिल्याने, आठ महिने व्यवसाय बंद असलेल्या घोडागाडी, उंट सफारी, एटीव्ही तसेच जलक्रीडा व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र अद्यापही जलक्रीडा व्यवसायिकांना एमएमबीने परवानगी दिली नसल्याने हे व्यवसायिक अडचणीत आले आहेत.