रायगड - मुंबई येथील तीन तरुण रोहा तालुक्यातील बल्ले चिंचोली गावातील कुंडलिका नदी पात्रात बुडाल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. यानंतर सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत दोघांचे मृतदेह सापडले होते. तर तिसरा पर्यटक बेपत्ता होता. आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास राफटर्सच्या हाती त्याचा मृतदेह लागला आहे.
महेश अरुण जेजुरकर (वय 39), परेश अरुण जेजुरकर (वय 35), अक्षय शालिग्राम गणगे (वय 29) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.
कुंडलिका नदीत बुडालेल्या तिसऱ्या पर्यटकाचा मृतदेह शोधण्यात यश
रोहा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संकेत पवार हे मुंबईहून आपल्या काही मित्रांसह गावी आले होते. त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संकेत पवार हे महेश जेजुरकर, परेश जेजुरकर, अक्षय गणगे यांच्यासह अन्य मित्रांबरोबर गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी पात्रात पोहण्यास गेले. त्यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने महेश, परेश व अक्षय हे तिघे बुडाले. त्यावेळी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सोबत आलेल्या मित्रांनी केला. मात्र, त्यांना अपयश आले.
पोलिसांनी राफटर्सच्या मदतीने रविवारी दुपारपासून शोधमोहीम हाती घेतली होती. रविवारी उशिरापर्यंत परेश व अक्षय या दोघांचे मृतदेह हाती लागले होते. मात्र महेशचा शोध लागत नव्हता. दरम्यान, संध्याकाळ झाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आल्यानंतर महेशचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
दुर्घटनेतील तिन्ही तरूण परीसरातील सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांच्या जाण्याने ट्रॉम्बे गावात हळहळ व्यक्त होत आहे. परेश व महेश जेजुरकर बंधू फुलांच्या सजावटीचा व्यवसाय करीत होते. तर अक्षय गणके हा आय टी कंपनीत कामाला होता.