लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मेंढपाळ कुटूंबाला मिळाला प्रशासनाचा आधार - अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायत
अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत मु. खांदोरी, ता. लोणंद जि. सातारा येथील कोकरे हे मेंढपाळ आपल्या 15 जणांच्या कुटूंबासह चारशे ते पाचशे शेळ्यामेंढ्या घेऊन चार महिन्यांपूर्वी दाखल झाले आहेत.

रायगड - पश्चिम महाराष्ट्रातून मेंढपाळ हा दरवर्षी रायगडात आपल्या मेंढ्याना घेऊन दाखल होत असतो. यावर्षीही मेंढपाळ हा जिल्ह्यात दाखल झाला आहे. मात्र, कोरोनामुळे हा मेंढपाळ आता आपल्या शेळ्या मेंढ्या आणि कुटुंबासह अडकून पडला आहे. असेच एक सातारा जिल्ह्यातील सोनबा सोना कोकरे आणि नारायण सोमा कोकरे ही मेंढपाळ कुटूंब अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत अडकली आहेत. या कुटूंबाची प्रशासनाकडून खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मेंढपाळ कुटूंबांना प्रशासनाचा आधार मिळाला आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मेंढपाळ समाज हा मोठ्या प्रमाणात आपल्या मेंढ्या आणि कुटूंबासह घाट माथ्यावरून रायगड, कोकणात दाखल होतो. रायगड जिल्ह्यातही मेंढपाळ समाज मोठ्या प्रमाणात दाखल होत असतो. आपल्या शेकडो शेळ्या मेंढ्या घेऊन मेंढपाळ हा शेतकऱ्याच्या शेतात राहत असतो. मेंढ्याच्या पडलेल्या विष्टा ह्या शेतामध्ये खतांच्या पद्धतीने काम करीत असतात. याबाबत शेतकरी हा मेंढपाळ याना आपल्या शेतात राहण्यासाठी जागा आणि काही प्रमाणात मोलमजुरी मिळत असते. मात्र, कोरोनामुळे स्थानिक शेतकरीही अडचणीत आल्याने ही मेंढपाळ कुटूंबही आर्थिक अडचणीत सापडली आहेत. पाऊस सुरू होण्याच्या आधी हा मेंढपाळ हा आपल्या कुटूंब कबिला घेऊन पुन्हा गावी जात असतो.