महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक वनदिनानिमित्त 21 मार्चला महाराष्ट्रात प्रथमच होणार गिधाडगणना - raigad vulture news in marathi

गिधाडगणना वनखात्याच्या सहकार्याने व अनेक पक्षीमित्रांच्या सोबतीने करण्यात येणार आहे. याकरिता घेतलेल्या पूर्वप्रशिक्षणात विविध गट तयार करण्यात आले आहेत.

first vulture census
first vulture census

By

Published : Mar 18, 2021, 6:59 PM IST

रायगड - आंतरराष्ट्रीय स्तरावरील नैसर्गिक पद्धतीने गिधाडसंवर्धनाचा प्रकल्प राबविणारे, रायगड जिल्ह्यातील पक्षीशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांच्या सिस्केप संस्थेमार्फत गेल्या तीन दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या गिधाड संवर्धन व संशोधन प्रकल्पांतर्गत येत्या 21 मार्च या जागतिक वनदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, सुधागड (पाली) या तालुक्यांतून गिधाडांची गणना होणार आहे. या गिधाड गणनेचे पूर्वप्रशिक्षण नुकतेच श्रीवर्धन येथे 6 ते 10 मार्चदरम्यान पार पडले. यामध्ये एकूण 43 पक्षीप्रेमी व वनखात्याचे कर्मचारी यांनी भाग घेतला होता.

सिस्केप संस्थेकडून पुढाकार

सिस्केप संस्थेचे म्हसळा तालुक्यातील चिरगाव बागाची वाडी, महाड तालुक्यातील नाणेमाची येथील गिधाड संवर्धनाचे काम गेली तीन दशके सुरू असून विशेषत: पांढऱ्या पाठीचे व लांब चोचीचे गिधाड या प्रजातीच्या गिधाडांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यातच मध्यंतरी झालेले निसर्ग चक्रीवादळ यामुळे अनेक झाडांची पडझड झाली त्यात गिधाडांची अनेक घरटीदेखील उद्ध्वस्त झाली. त्यामुळे नेहमीची ठिकाणे सोडून गिधाडांनी तात्पुरते स्थलांतर केले होते. या सगळ्यांचा नेमका या गिधाड प्रजातींच्या अधिवासावर काय परीणाम झाला आहे. याबाबत नव्याने संशोधन होणे गरजेचे असल्याने जागतिक वनदिनाच्या निमित्ताने गिधाडगणना करण्याचे संस्थेने ठरविले आहे.

वनखात्याचेही होणार सहकार्य

गिधाडगणना वनखात्याच्या सहकार्याने व अनेक पक्षीमित्रांच्या सोबतीने करण्यात येणार आहे. याकरिता घेतलेल्या पूर्वप्रशिक्षणात विविध गट तयार करण्यात आले आहेत. महाड तालुक्यातील नाणेमाची, सुधागड पाली तालुका, माणगाव तालुक्यातील वडघर, म्हसळा तालुक्यातील चिरगांव, सडकेची वाडी, भेकऱ्याचा कोंड, श्रीवर्धन तालुका, अशा सहा ते सात ठिकाणी पाच पूर्वप्रशिक्षणार्थी व दोन वनखात्याचे कर्मचारी असा एकेक गट गिधाडगणना करणार आहे.

21 मार्चच्या पहाटेपासून होणार मोजदाद

20 मार्च रोजी निरीक्षणस्थळी गटातील सदस्य वस्ती करतील व 21 मार्च रोजी पहाटेपासून त्या-त्या जागी घरट्यांच्या ठिकाणी गिधाडांची मोजदाद होईल. दिवसभरात त्यांच्या विविध हालचाली, त्यांची जाण्याची दिशा, परत येण्याची दिशा अशा सर्व बाबींची नोंद घेतली जाणार आहे. या गिधाड गणनेमध्ये घरट्यांची एकूण संख्या, घरट्यामध्ये असलेल्या गिधाडांची संख्या, ते झाड कोणाच्या मालकीचे आहे, त्याचे गुगलवरील स्थान, त्यावरील गिधाडांची प्रजात, झाडावर बसलेला पक्षी कसा दिसतो. उडताना त्यास कसे ओळखावे, त्याची उड्डाणपद्धत, घरटे बनविण्यासाठी वापरलेले साहित्य, घरट्यांतील पिल्लांची ओळख, घरट्यांची उंची व इतर निरीक्षणे, दुर्बिणीद्वारे निरीक्षण अशा परीपूर्ण शास्त्रीय दृष्टीने ही गिधाडगणना होणार असून या गिधाडगणनेमुळे सिस्केप संस्थेच्या भारतातील एकमेव या नैसर्गिकरित्या गिधाड संवर्धन व संशोधनाला एक नवा आयाम मिळणार आहे.

सिस्केप संस्थेमार्फत स्वखर्चाने गिधाडांना अन्नपुरवठा

सध्या सिस्केप संस्थेकडून या गिधाडांच्या संवर्धनासाठी स्वखर्चाने गिधाडांना अन्नपुरवठा केला जात आहे. जखमी किंवा कुपोषित गिधाडांचे संगोपन वनखात्याच्या निरीक्षणाखाली केले जाते. त्याकरिता गेली 30 वर्षे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संस्थेने गिधाडांविषयी जनजागृती केली आहे. सिस्केप संस्थेच्या या निसर्गसंवर्धन कार्याची आता शासनाने दखल घेऊन या प्रकल्पाला अर्थसहाय्य केले पाहिजे. तसेच आपल्या बागेतील नारळाच्या, आंब्याच्या व डोंगरातील इतर उंच झाडांवर घरटी केलेल्या त्या गिधाडांची अप्रत्यक्षपणे जपणूक या बागायतदारांनी केली आहे. वनखात्याकडून अशा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठीही संस्था प्रयत्न करीत असते. परंतु शासनाकडून गिधाड संवर्धनासाठी अशा नुकसानभरपाई संदर्भात कायद्याची जोड मिळणे खूप गरजेचे आहे व त्यासाठी ही गिधाडगणना खूप महत्त्वाची ठरणार असल्याचे मत, सिस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details