रायगड - रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने एकाच दिवशी दुकाने खुली करण्याचे दोन वेगवेगळे आदेश काढले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील तालुक्यात दुकाने सर्रास उघडी असताना अलिबाग शहरातील व्यापाऱ्यांवर दुकाने बंद करण्याची सक्ती केली जात आहे. आधीच कोरोनाने व्यापारी वर्ग आर्थिक संकटात आले आहेत. त्यात अलिबागच्या व्यापाऱ्यांना वेगळा न्याय का? त्यांनाही दुकाने सुरू करण्याची परवानगी, द्या अशी मागणी भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी केली आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी तुषार विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन आदेशामुळे व्यापारी संभ्रमात
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संचारबंदी लागू आहे. याकाळात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना आणि दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण रायगडसाठी पोलीस अधीक्षक आणि आयुक्त कार्यालय क्षेत्रात दोन वेगवेगळे आदेश जाहीर केले आहेत. या आदेशामध्ये दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहतील असे म्हटले आहे. तर, आदेश असूनही अलिबागमधील व्यापाऱ्यांना दुकाने खुली करू दिली जात नाहीत. त्यामुळे प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप महेश मोहिते यांनी केला आहे.