रायगड -कूळ वहिवाट कायद्याची जमीन फेरफार करण्यासंदर्भात पंधरा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी, मुरुड तहसीलदार गमन गावीत यांच्यासह संदेश सदानंद वांळज, रेमनाथ श्याम पाटील या दोन कर्मचार्यांना लाचलुचपत खात्याने रंगेहाथ पकडून अलिबाग येथील न्यायालयात हजर केले. या तिघांनाही 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुळवहिवाट 32 ग प्रमाणपत्रासाठी मागितली होती लाच
यशवंत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसात, आपल्या जमिनीच्या विक्रीसाठी त्यावर असलेले कूळ वहिवाटीचे 32 ग प्रमाणपत्राची मुरुड तहसीलदार तथा शेतजमीन न्यायधिकार प्राधिकरणकडे मागणी करण्यात आली होती. मात्र मुरूड तहसीलदार गमन गावित यांच्या सांगण्याप्रमाणे लोकसेवक शिपाई संदेश सदानंद वांळज याने त्यासाठी तक्रारदार यशवंत पाटील यांच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यशवंत पाटील यांनी थेट नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधत तक्रार केली. मागितलेल्या लाचेनुसार या तक्रारीची खात्री करून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. तहसीलदार यांच्यासह दोन कर्मचाऱयांना सापळा रचून रंगेहाथ पकडून अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले.
एक दिवसाची पोलीस कोठडी
बुधवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान तक्रारदार यशवंत पाटीलकडून 15 हजार रुपयांची लाच तहसीलदार गमन गावित यांच्या सांगण्यावरून शिपाई रेमनाथ पाटील यास घेताना या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑगस्ट 2021 रोजी अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.