रायगड - अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात ४ जणांचा बळी गेला आहे. उरणमध्ये दोन भाजी विक्रेत्या महिलांच्या अंगावर मंदिराची भिंत कोसळून मृत्यू झाला. पेण गागोदे इथं रामा कातकरी या आदिवासी वृद्धाचा तर रोह्यात रमेश साबळे या व्यक्तीच्या अंगावर झाड कोसळल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील ५ हजार २४४ घरांचे अंशतः तर ९ घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाने जिल्ह्यातील ५०० हुन अधिक विजेचे खांब कोसळले आहेत. अलिबाग आणि मुरुडमधील वीजपुरवठा अद्यापही खंडित असून तो पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे आजपासून (मंगळवार) सुरु करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. आपघातग्रस्तांना सरकारी नियमानुसार मदत दिली जाईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे शर्तीचे प्रयत्न -
रत्नागिरी जिल्ह्यातून तौक्ते चक्रीवादळ हे पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रायगडच्या समुद्रात दाखल झाले. मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यात सोसाट्याचे वादळी वारे वाहू लागले होते. पावसानेही हजेरी लावली होती. वादळी वारे आणि पाऊस सुरू असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे रायगडकारांना वीजेविना भीतभीत रात्र काढावी लागली आहे. वादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असले तरी अद्यापही वाऱ्याचा जोर ६० ते १०० किमी प्रतितास वेगाने आहे. अलिबाग, मुरुड तालुके हे ३० तासाहून अधिक काळ अंधारातच आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
अद्यापही वाहत आहेत जोराचे वारे -
३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळ हे साधारण तीन ते चार तासात जिल्ह्यातून पुढे सरकले होते. मात्र तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव बारा तासानंतरही सुरूच आहे. वादळ मुंबईच्या दिशेने पुढे गेले असले तरी जिल्ह्यात अजूनही सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू आहे. ३० तास उलटले तरी वादळाचा प्रभाव अजूनही जिल्ह्यात सुरूच आहे.
चार जणांचा वादळाने घेतला बळी,तीन जनावरांचाही मृत्यू -