रायगड- जिल्ह्यात कोरोना लक्षणे आढळलेल्या रुग्णाचे स्वॅब तपासणी घेऊन ते मुंबईत पाठवले जात आहेत. त्यामुळे रिपोर्ट येण्यास वेळ लागत आहेत. यासाठी अलिबाग येथे स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. लवकरच अलिबाग येथे स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू होणार आहे. दारिद्र रेषेखालील नागरिकांची स्वॅब टेस्टिंग खर्च हा जिल्हा नियोजन निधीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेतीन रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला केले आहेत.
'अलिबागमध्ये लवकरच स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू होणार' - रायगड कोरोना न्यूज
दारिद्र रेषेखालील नागरिकांची स्वॅब टेस्टिंग खर्च हा जिल्हा नियोजन निधीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार रविशेठ पाटील, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर, महेश बाळदी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होते.
आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची काळजी घेतली जात आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची यादी सादर करावी. तसेच जिल्ह्यातील अॅम्ब्युलन्स वाहनचालकांचे प्रबोधन करून त्यांना धैर्य देऊन ते कोरोना रुग्णाला नेण्यासाठी नकार देणार नाहीत, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून प्रयत्न करावेत. कोरोनाबाधित रुग्णांना ने-आण करण्यासाठी अॅम्ब्युलन्सच्या वाहनचालकांना सुरक्षेविषयी लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या मात्र कंटेनमेंट झोनमध्ये राहत असल्यामुळे कामावर न जाऊ शकणाऱ्या कामगारांबाबत, कर्मचाऱ्यांबाबत त्यांच्या आस्थापनांना अशा कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येऊ नये, असे पत्र प्रशासनाकडून देण्यात यावे. येणाऱ्या पुढील काळासाठी सर्वजण एकजुटीने खंबीरपणे उभे राहू या, असेही त्यांनी उपस्थितांना शेवटी आवाहन केले.