पालकमंत्री तटकरेंच्या प्रयत्नातून उरणसह कर्जतमध्ये स्वॅब टेस्टिंग बूथची उभारणी - aditi tatkare
कोरोनाच्या वाढत्या संशयित रुग्णाचे स्वॅब नमुने त्वरित घेणे गरजेचे असल्याने कोविड 19 स्वॅब सॅम्पल कलेक्शन बुध नवीन उपकरण तयार करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव, महाड, रोहा, तळा, सुधागड आदी ठिकाणी हे बूथ आधीच कार्यान्वित करण्यात आले आहेत.
रायगड - जिल्ह्यात उरण, कर्जत तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची तपासणी करताना आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून, आरोग्य सेवकांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून उरण व कर्जत येथे नवीन तंत्रज्ञानावर आधारित स्वॅब सॅम्पल तपासणी बूथ (स्वॅब टेस्टिंग क्यूब) देण्यात आले आहेत. पालकमंत्री तटकरे यांच्या सूचनेनुसार रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन, रोहा यांच्यातर्फे बारदेस्कर यांनी दोन स्वॅब टेस्टिंग क्यूब आज सुपूर्द केले.
कोरोनाच्या वाढत्या संशयित रुग्णाचे स्वॅब नमुने त्वरित घेणे गरजेचे असल्याने कोविड 19 स्वॅब सॅम्पल कलेक्शन बुध हे नवीन उपकरण तयार करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव, महाड, रोहा, तळा, सुधागड आदी ठिकाणी हे बूथ आधीच कार्यान्वित करण्यात आले आहेत. करोना बाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी जवळून थेट संपर्क येतो आणि त्यातून त्यांना लागण होण्याची भीती असते. या स्वॅब टेस्टिंग बूथमुळे तपासणी करणाऱ्या तंत्रज्ञ आणि रुग्णामध्ये सुरक्षित अंतर राहत असल्याने ते रुग्णाच्या संपर्कात येत नाहीत.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटल, उरण व कर्जत येथील उप जिल्हा रूग्णालय येथे हे बूथ बसविण्यात येत आहेत. याद्वारे पीपीई किट चा खर्चाची बचत तर होईलच पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणी देखील होवू शकेल. तसेच या उपकरणामुळे पीपीई किट्सचा वापर न करताही सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्वॅब सॅम्पल घेता येतील.