रायगड - पूर्वीच्या काळी वीज नव्हती म्हणून अनेक जण सूर्यप्रकाश किंवा रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात अभ्यास करीत होते. मात्र आता वीज आहे, सर्व सुविधा आहेत. पण मोबाईल नेटवर्क नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना प्रादुर्भावमुळे शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी महाड तालुक्यातील खाडी पट्टा भागातील गावात मोबाईल रेंज नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण धोक्यात आले आहे.
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची कसरत रेंज देता का रेंज-
मोबाईल रेंजसाठी ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. ज्या ठिकाणी मोबाईलला रेंज मिळेल तिथे थांबून शाळेचा अभ्यास करावा लागत आहे. एवढेच नाही तर मोबाईल रेंज मिळावी यासाठी विद्यार्थ्यांना झाडावर चढण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे 'कोणी आम्हाला मोबाईल रेंज देता का रेंज' अशी बोलण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे.
ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची कसरत कोणताही मोबाईल टॉवर नाही-
महाड शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर खाडी पट्टा परिसर सुरू होतो. दासगाव खाडी पट्यातील वलंग, रोहन, वलंग बौद्धवाडी, विठ्ठल वाडी, खैरे, खैरांडे, सुतार कोंड, आदिस्ते मुळगाव ही गावे वसली आहेत. ही गावे डोंगराच्या कुशीत असल्याने याठिकाणी कोणताही मोबाईल टॉवर नाही. या गावातील शेकडो विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज शिक्षण घेत आहेत. कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्वच विद्यार्थी हे घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र मोबाईल असूनही रेंज नसल्याने ऑनलाइन शिक्षणात येथील विधर्थ्यांना अडचणी येत आहेत.
ऑनलाइन शिक्षणाचे वाजले बारा-
शिक्षकांनी शाळेच्या अॅपवर ऑनलाइन अभ्यास पाठविलेला असला तरी या विद्यार्थ्यांना हा गृहपाठ बघण्यासाठी वा डाऊनलोड करण्यासाठी गावापासून चार ते पाच किलोमीटर बाहेर येऊन मोबाईल रेंज असेल त्या भागात यावे लागत आहे. त्यानंतर विद्यार्थी हे आलेला गृहपाठ डाऊनलोड करून अभ्यास करीत आहेत. मोबाईल रेंज मिळावी यासाठी झाडाचाही आसरा हे विद्यार्थी घेत आहेत. तर रस्त्याच्या बाजूला रेंज मिळत तिथे बसून विद्यार्थी आपला अभ्यास करीत आहेत. त्यातच सतत जात असलेल्या विजेमुळे मोबाईल चार्ज करणे हा एक मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे. गावात मोबाईल रेंज नसल्याने शिक्षकांचाही संपर्क विद्यार्थ्याबरोबर होत नाहीत. मोबाईल रेंज समस्येमुळे येथील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचे मात्र बारा वाजले आहेत. त्यामुळे खाडी पट्टा परिसरात मोबाईल टॉवर बसविण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकामधून जोर धरत आहे.
नोट्स डाऊनलोड करण्यासाठी पायपीट-
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अभ्यासासाठी मोबाईलही पालकांनी घेतला आहे. मात्र आमच्या गावात मोबाईल रेंज नसल्याने शिक्षकांनी पाठविलेल्या नोट्स डाऊनलोड करण्यासाठी चार ते पाच किलोमीटर जावे लागते. रेंज मिळावी यासाठी झाडावर चढून मग नोट्स डाऊनलोड केल्यानंतर घरी येऊन त्या आम्ही वहीत लिहित असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी सिद्धेश कुरुणकर याने दिली.
शासनाने उपाययोजना करणे गरजेचे-
खाडी पट्टा परिसरातील नऊ ते दहा गावात मोबाईलला रेंज नाही. याठिकाणी असलेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलेला ऑनलाइन अभ्यास बघण्यासाठी चार पाच किलोमीटर पायी चालत जंगलात, रस्त्यावर जिथे रेंज मिळेल तिथे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत शिक्षक राजन कुर्डुनकर यांनी व्यक्त केले आहे.