महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तिथे सर्व सोईसुविधा होत्या, मात्र घरी येण्याची ओढ लागली होती' कोटाहून घरी परतलेल्या मायलेकींनी सांगितली आपबिती - कोटा येथून विद्यार्थी रायगडमध्ये

'दीड महिना राजस्थानच्या कोटा येथे आम्ही राहिलो, हे दिवस आमच्या चांगलेच आठवणीत राहणार आहेत. एक प्रकारे आम्ही होम क्वारंटाईनच होतो. एकमेकाला धीर देत हे दिवस आम्ही काढले असून राजस्थान आणि महाराष्ट्र शासनाने आमची मदत करून आम्हाला पुन्हा स्वगृही आणले याबाबत त्याचे आभार मानत आहोत' अशा भावना कोटा येथून अलिबागमध्ये परतलेल्या श्रिया घरत या विद्यार्थीनीने आणि तिची आई राजश्री घरत यांनी ईटीव्ही भारतजवळ व्यक्त केल्या आहेत.

student and his mother say thank you to maharashtra government
श्रिया घरत आणि राजश्री घरत अलिबाग

By

Published : Apr 29, 2020, 4:03 PM IST

Updated : Apr 29, 2020, 5:53 PM IST

रायगड - अलिबाग शहरातील श्रिया घरत ही राजस्थान कोटा येथे दोन वर्षांपासून शिक्षण घेत होती. बारावीची परीक्षा झाल्यानंतर इंजिनिअर जेईईची परीक्षा होणार होती. यासाठी तिची आई राजश्री घरत या 11 मार्च रोजी कोटा येथे गेल्या होत्या. परीक्षा झाल्यानंतर श्रिया आणि तिची आई पुन्हा अलिबागला येणार होते. तत्पूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरू झाल्याने 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे त्या दोघेही तेथेच अडकून पडल्या होत्या. अखेर दीड महिन्यानंतर राज्य सरकारने त्यांना विशेष सवलत देत स्वगृही आणले.

राजस्थानच्या कोटा येथून अलिबागला परलेल्या मायलेकींनी ईटीव्ही भारतकडे आपल्या भावना व्यक्त केल्या...

हेही वाचा..."त्या दोन महिन्यात जे शिकलो ते आयुष्यभरात शिकलो नसतो", कोटा येथून परतलेल्या विद्यार्थ्याची आपबिती

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आम्ही कोटा येथे अडकलो. माझ्यासोबत आई असल्याने मला धीर मिळत होता. मात्र इतर विद्यार्थ्यांचे पालक जवळ नसल्याने त्याचा धीर खचत चालला होता. तसेच रोज तेच ते जेवणाचे पदार्थ मिळत असल्याने जेवणाची इच्छाही कमी झाली होती. काही दिवसांनी इतर राज्यातील विद्यार्थ्यांना तेथील राज्य सरकारने घरी परतण्याची सोय करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आमच्याही मनाची घालमेल सुरू झाली होती. मात्र राजस्थान सरकारने आमची पूर्ण काळजी घेतली, असे श्रिया घरत हिने ईटीव्ही भारत बरोबर बोलताना सांगितले.

लॉकडाऊनमुळे राजस्थानमध्ये अडकले गेलो. इतर मुले देखील घाबरली होती. माझ्यासह इतर पालक त्या मुलांना धीर देत होतो. मात्र, आमचाही धीर खचत चालला होता. आम्हाला घरी नेण्यासाठी दररोज शासन आणि प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू होते. नातेवाईकांकडूनही आम्हाला घरी नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना संपर्क केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थान सरकारशी बोलून आम्हाला सुखरूप घरी आणण्यासाठी मदत केली आहे. यासाठी आपण राज्य शासनाचे आभार मानत आहेत, असे श्रिया घरत हीची आई राजश्री घरत यांनी सांगितले.

तसेच आमची तपासणी करून आम्हाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासन आणि प्रशासन यांच्या सूचनेनुसार आम्ही घरी राहून त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत. मात्र, राजस्थानच्या कोटामधील दीड महिन्यातील हे दिवस चांगलेच आठवणीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Apr 29, 2020, 5:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details