रायगड- मुंबई, ठाण्यासह, कोकण तसेच जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. येत्या २ सप्टेंबरपासून या उत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. परिणामी जिल्हा पोलीस व वाहतूक पोलीस दलाकडून २८ ऑगस्टपासून रायगड हद्दीतील मुंबई गोवा महामार्गावर चोख वाहतूक बंदोबस्त करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर १४ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच पालीफाटा (खोपोली) वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (ए) वरुन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे ईत्यादी ठिकाणाहून रायगड, सिंधुदुर्ग,रत्नागिरी येथे गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीय आपल्या गावी जातात. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतुकीचे नियमन व नियंत्रण सुलभ व्हावे, म्हणून रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत वाहतूक बंदोबस्ताची नियोजनबध्द आखणी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस निरीक्षक, २० सह.पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ३८४ पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर, महामार्गावर १० वाहतूक मदत केंद्रांवर क्रेन, अॅम्ब्युलन्स तयार ठेवण्यात येणार आहेत. एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास ते वाहने तात्काळ बाजूला करुन वाहतूक सुरळीत ठेवली जाणार आहे. तसेच महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात आली असून गणेशभक्तांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून ठिकठीकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत.