महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी लावलेल्या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळू शकणार आहे.

रायगड कर्फ्यू
रायगड कर्फ्यू

By

Published : Apr 10, 2021, 4:58 PM IST

रायगड -कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात शुक्रवार ते सोमवार कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातही या मिनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील रस्ते पुन्हा एकदा निर्मनुष्य झालेले पाहायला मिळत आहेत. रायगड पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळू शकणार आहे.

जिल्ह्यातील रस्ते झाले निर्मनुष्य

22 मार्च 2020 रोजी कोरोनाच्या अनुषंगाने देशात पूर्ण संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर आज वर्षानंतर पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला आणि राज्यात शासनाने शुक्रवार ते सोमवार कडक संचारबंदी लागू केली. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यातील रस्ते हे निर्मनुष्य झाले आहेत.

अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद

संचारबंदीत अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, मासळी, भाजी, चिकन मटण दुकानेसुद्धा संचारबंदीत बंद ठेवण्यात आली आहेत. तर मेडिकल, दूध ही अत्यावश्यक असलेली दुकाने मात्र खुली आहेत. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

एसटी वाहतूक सुरू पण प्रवासी नाहीत, जल वाहतूकही बंद

अत्यावश्यक सेवेत असलेली एसटी बस सेवा सुरू असली तरी प्रवासी नसल्याने रिकाम्या बस धावत आहेत. संचारबंदी असल्याने एसटी प्रशासनाने फेऱ्या कमी केल्या आहेत. अलिबाग आगारातून पनवेलपर्यंत आणि वस्तीच्या आलेल्या दूरच्या पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात आहेत. मांडवा ते गेटवे ही जलवाहतूक सेवाही बंद करण्यात आलेली आहे.

ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

संचारबंदीच्या अनुषंगाने रायगड पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या नागरिकांना विचारपूस करून सोडले जात आहेत. तर विनाकारण येणाऱ्या नागरिकांना परत माघारी फिरविले जात आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details