रायगड -कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाच्या नावावर जमीन असून, त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांना जमीन खरेदी करण्यासाठी भाऊ श्रीरंग पाटणकर यांच्याशिवाय आणखी दोन मध्यस्थ का लागले ? असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ते कर्जत तहसीलदारांची भेट घेतल्यानंतर बोतल होते.
नोव्हेंबर 2020 मध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया हे कर्जत येथे जमीन खरेदी प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आले होते. त्यावेळी तालुक्यातील वैजनाथ येथील जमिनीची नोंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आली होती. याबाबत कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि किरीट सोमैया यांची बंद दाराआड चर्चा झाली होती.
सोमैया यांचे मुख्यमंत्र्यांवर जमीन घोटाळ्याचे आरोप जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी
दरम्यान आज पुन्हा एकदा सोमैया यांनी कर्जत तहसीलदारांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करत, काही सवाल उपस्थित केले आहेत. कोलई येथील जमीन मोकळी आहे असे मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक शपथपत्रात नमुद करण्यात आले होते. मग असे असताना नोव्हेंबर 2020 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोलई य़ेथील बंगल्याची आठ वर्षांची घरपट्टी कशी भरली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच कर्जत तालुक्यात रश्मी उद्धव ठाकरे यांनी जमीन त्यांचे भाऊ श्रीरंग पाटणकर यांच्याकडून खरेदी केली. भावाबहिणीत जमीन खरेदी व्यवहार होत असताना त्यात दोन त्रयस्थ व्यक्ती कशासाठी ? असा सवालही यावेळी सोमैया यांनी केला आहे. कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आपल्याला माहिती देताना कोणत्याही जमिनीचा सातबारा नंबर सारखा असू शकत नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या जमिनी आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी सोमैय्या यांनी केली आहे.