रायगड : तुमच्या घरात लहान मुले आहेत का? मुले जेवत नाहीत, हट्ट करतात, मस्ती करतात याला उपाय म्हणून तुम्ही मुलांच्या हातात सतत मोबाईल देता का? पण तुम्ही मुलांना खेळणं म्हणून दिलेला मोबाईल तुमच्या घरातील मुलांच्या जीवावरही बेतू शकतो. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. ज्यात एक 6 वर्षाची चिमुरडी जखमी झाली आहे. या मुलीवर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत.
कुठे घडली घटना :मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील आंबिवली गावात घडली. अनिता दिनेश वाघमारे असे या मुलीचे नाव आहे. मोबाईच्या बॅटरीच्या स्फोटात चिमुरडीच्या तिच्या तोंडाला आणि जबड्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. तिला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर तिच्यावर पुढील अधिकच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची अधिकची माहिती : या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जखमी अनिता वाघमारे ही 6 वर्षाची चिमुरडी रविवारी दुपारी मोबाईल सोबत खेळत होती. ती मोबाईल सोबत खेळत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात अनिता जखमी झाली. या स्फोटात तिच्या हात, चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. तिच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत. दरम्यान, लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईलचा अतिवापर वाढला असून मोबाईलच्या आहारी जाण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. या घटनेमुळे पालक वर्गात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
यामुळे होतो मोबाईलचा स्फोट : स्मार्टफोनचा स्फोट होण्याची अनेक कारणे आहेत. ओव्हरहीटिंग हे त्यापैकी एक कारण आहे. जास्त वेळ मोबाईल चार्ज होत असलेल्या स्मार्टफोनचेही तापमान वाढत असते. तसेच जास्त वेळ मोबाईलवर गेम खेळत असाल तर सावधान कारण त्यामुळेही मोबाईल गरम होत असतो आणि स्फोट होण्याची शक्यता असते. कार चालवताना डॅशबोर्डवर स्मार्टफोन ठेवू नका.