महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर - रायगड सहा पोलीस अधिकाऱ्यांना पदक

रायगड जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. कठीण आणि खडतर कामगिरी केल्याबद्दल पाच जणांना तर गेली ३६ वर्षे राष्ट्रीय सणाच्या वेळी ध्वज बांधण्याचे काम करणाऱ्या एका जणाला विशेष सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे.

सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर
सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर

By

Published : Jan 25, 2020, 11:32 PM IST

रायगड -राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला जातो. यावर्षी रायगड जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. कठीण आणि खडतर कामगिरी केल्याबद्दल पाच जणांना तर गेली ३६ वर्षे राष्ट्रीय सणाच्या वेळी ध्वज बांधण्याचे काम करणाऱ्या एका जणाला विशेष सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यावेळी पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पदकांचे वितरण होणार आहे.


पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, अलिबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, एमआयडीसी महाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक फौजदार विलास जंगम यांना हे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

हेही वाचा - 'अनिवासी भारतीयांचे सदैव देशाच्या विकासात योगदान'
पेणचे उपविभागीय अधिकारी नितीन जाधव यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आणि मुलचेरा या नक्षलग्रस्त भागात सलग दोन वर्षे सेवा दिलेली आहे. या दरम्यान त्यांनी दहा नक्षलवादी आणि नक्षल समर्थकांना अटक केली असून ३० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करवून घेतले आहे. रोहा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या भागात तर सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात दोन वर्षांहून अधिक काळ सेवा केल्याबद्दल त्यांना विशेष सेवापदक जाहीर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील नक्षलविरोधी कारवाईदरम्यान वासने घाट जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटके शोधून निष्क्रिय केली होती. त्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार विलास जंगम हे १९८४ पासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे ३६ वर्षे पोलीस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, पोलीस अधीक्षक निवासस्थान, जिल्हा कोषागार, जिल्हा कारागृह या ठिकाणी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन या राष्ट्रीय सणांच्या वेळी ध्वज बांधण्याचे काम अविरत आणि चोखपणे करत आहेत. त्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details