रायगड - मुरुड येथील काशीद पुलाच्या दुर्घटनेत कारमध्ये फसलेल्या आपल्या कुटुंबाचे अवघ्या १० वर्षाच्या श्री भायदे याने प्राण वाचवून आपल्या असीम धैर्याचे दर्शन घडविल्याबद्दल पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडून 75 व्या स्वातंत्र्यदिनी श्री भायदेचे कौतुक करून सत्कार करण्यात आला आला.
पालकमंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते श्री भायदेचा सत्कार काशीद पूल प्रकरणी श्रीने केले होते धाडसी कार्य -
दिनांक ११-७-२०२१ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे सागर मनोहर भायदे (वय ४० वर्षे, रा. मसाला गल्ली, मुरुड) हे कुटुंबासोबत त्यांच्या मालकीच्या ईरटीगा कार नं. एमएच-४३ / AZ/ ३९२० ही घेऊन मुरुडवरून मुंबईकडे जात असताना नांदगाव गावच्या हद्दीतील काशीद ब्रिज येथे अचानक पूल कोसळल्याने सागर भायदे यांची कार पुलात फसली व कारमध्ये पुराचे पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह इतका होता की भायदे कुटुंबीयांना कारमधून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्याचवेळी सागर भायदे यांचा मुलगा श्री (वय १० वर्ष) याने कारची मागील काच ही हातापायांनी जोरात ठोके मारून फोडली व त्यातून बाहेर पडला. त्यामुळे सागर भायदे हे देखील बाहेर पडून शकले व त्यांनी बाहेर पडून त्यांचे कुटुंबातील सर्वांना एकएक करून बाहेर काढले. त्यावेळी सागर यांनी त्यांचे नातेवाईक संदीप पाटील, माजी नगरसेवक मुरुड यांना फोन करून कळविले असता बारशिव गावातील नागरिक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे शोधाशोध सुरु केली असता श्रीने आवाज दिल्याने त्या घटनास्थळावरून नागरिकांनी त्यांना सुखरूपणे बाहेर काढून तात्काळ प्राथमिक रूग्णालय बोर्ली येथे उपचाराकरिता दाखल केले होते.
पालकमंत्र्यांकडून श्रीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सदर घटना घडल्यानंतर सर्व रायगड जिल्ह्यात श्रीचे कौतुक केले जात आहे. श्रीच्या पूर्ण कुटुंबास पोलीस मुख्यालय अलिबाग-रायगड येथे बोलावून पालकमंत्री आदीती तटकरे यांनी श्रीला प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देवून त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.