रायगड- पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत नाव न छापल्याने शिवसेना नेत्याने जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेच्या पक्षप्रतोद मानसी दळवी यांनी सोमवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांना मारहाण केली. त्यामुळे जिल्हा परिषदेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निमंत्रण पत्रिकेत नाव न छापल्याने शिवसेना महिला नेत्याकडून जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्याला मारहाण
पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत नाव न छापल्याने शिवसेना नेत्याने जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
रायगड जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी दिला जाणारा'रायगड भूषण' पुरस्कारांचे वितरण ९ मार्चला रोहा येथे पार पडले. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत जिल्हा परिषदेतील अन्य पक्षांच्या प्रतोदांची नावे छापण्यात आली होती. परंतु, शिवसेनेच्या पक्षप्रतोद मानसी दळवी यांचे नाव वगळण्यात आले होते. यापूर्वीही अनेक कार्यक्रमात दळवी यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. याचा जाब विचारण्यासाठी मानसी दळवी ओसवाल याच्या दालनात गेल्या होत्या. नाव न छापण्याबाबत विचारणा केली असता ओसवाल यांच्याकडून यासंदर्भात समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संतप्तझालेल्या दळवी यांनी त्यांना बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत बराच काळ तणावाचे वातावरण होते.
यासंदर्भात निखिलकुमार ओसवाल यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना मोबाईलवरून संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. दरम्यान, यासंदर्भात कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नव्हती. रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षातील मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची नावे डावलण्याचा किंवा त्यांना क्रमवारीत मागे ठेवण्याचा प्रकार सातत्याने होत आहे. याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनाही सांगितले आहे. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही मानसी दळवी यांनी सांगितले.