रायगड- विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारचा शेवटचा दिवस असल्याने पनवेलमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. पनवेलमध्ये बंडखोरी थंड करण्यात वरिष्ठांना यश आले आहे. मात्र, उरणमध्ये भाजपची बंडखोरी कायम आहे. त्यामुळे सेनेचे मनोहर भोईर यांची डोकेदुखी वाढणार आहे.
पनवेल मतदारसंघामध्ये भाजपच्या प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, तरीही याच मतदारसंघातून शिवसेनेचे बबन पाटील यांनीही अर्ज भरला. जागावाटपामध्ये उरण मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. तेथे शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी अर्ज भरला आहे. मात्र, भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करत शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पनवेलचे भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. उरणच्या बंडखोरीला ठाकूरांची साथ असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. पनवेल व उरणमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढणार असल्याचे चित्र जवळपास दिसून येत होते.