रायगड - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर गेली २४ वर्ष श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. आज तिथीनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगड किल्ल्याचा परिसर हा भगवामय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने दणाणून गेला आहे.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाला आहे. सकाळी ६ वाजता झेडपी शेडमधून पालखीचे प्रस्थान झाले. सकाळी साडेसहा वाजता नगारखान्यासमोर भव्य ध्वजारोहण करण्यात आले. राजदरबार येथे वक्ते सौरभ करडे यांचे व्याख्यान उपस्थितांसमोर झाले. सकाळी ७ वाजता शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यास प्रारंभ होऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ इतिहासतज्ञ आप्पा परब आणि मुंबईयेथील मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष धनावडे दाम्पत्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तर राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या जंगम समुहाकडून मंत्रोच्चार सुरू होता.