रायगड - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 राज्याभिषेक दिनोत्सव रविवारी 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा होत आहे. यानिमिताने किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठा आरक्षण विषयी आंदोलनाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज (शनिवारी) दुपारी खासदार संभाजीराजे गडाकडे प्रयाण करतील. संध्याकाळी गडपूजन आणि गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ होईल. रात्री शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होईल.
रायगडावर रविवारी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सोहळा छत्रपती संभाजीराजे करणार भूमिका स्पष्ट
रविवारी सकाळी ध्वजवंदनाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. छत्रपतींची पालखी राजसदरेवर आली की मुख्य राज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ होईल. त्याठिकाणी छत्रपती संभाजीराजे मार्गदर्शन करून आपली भूमिका मांडतील. त्यानंतर राजसदर ते शिवसमाधी अशी पालखी मिरवणूकीने सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 20 जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांनी गडावर न येता आपल्या घरात राहूनच राज्याभिषेक साजरा करावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.
सर्व रस्त्यांवर नाकाबंदी
शिवराज्याभिषेक दिनोत्सव सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर येण्याचे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुरुवातीला केले होते. नंतर मात्र कोरोना संकटामुळे कुणी येऊ नये असेही आवाहन त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांनी येऊ नये आणि गर्दी होऊ नये यासाठी रायगड पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. जिल्ह्याबाहेरून शिवभक्त येणार नाहीत याचीही काळजी घेतली जात आहे. ई-पास असणाऱ्यांनाच जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला गालबोट लागणार नाही तसेच सोहळा शांततेत पार पडेल याची सर्व खबरदारी पोलीस घेत आहेत.