पेण-रायगड - मागच्या दहा वर्षांपासून पेण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांवर सत्ताधाऱ्यांनी दडपशाही सुरू केली आहे. ती दडपशाही यापुढे चालू देणार नाही, असे वक्तव्य शिशिर धारकर यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी पुढे बोलताना शिशिर धारकर म्हणाले की, शहरातील अनेक विकास कामांबरोबर रिंगरोड आणि जागांवर टाकलेले आरक्षण यामधून कोट्यावधी रूपये कमविले असून आपल्या स्वार्थासाठी रवि पाटील राजकारण करीत आहेत.
पेणच्या जनतेने यांच्यावर अधिक विश्वास न ठेवता वेळीच सावध होणे गरजेचे आहे. पेण अर्बन बँकेच्या बाबतीत मी स्वतः ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करीत असून सध्या न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यामुळे त्यात अधिक बोलणे उचित ठरणार नाही, परंतु पेणकरांना या सर्व गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे. खोपोली संघर्ष समितीच्या माध्यमातून ठेवीदारांनी न लढता पेण अर्बन बँकेचे (Pen Urban Bank) मुख्य ठिकाण पेण असल्याने पेणकरांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. संघर्ष समिती ठेविदारांच्या हिताचे काम करीत नाही असेही धारकर यांनी सांगितले.
शिशिर धारकरांचे आरोप
रवि पाटीलांचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी चार दिवस अगोदर सांगितले की अर्बन बँकेत माझे १० लाख रुपये अडकले आहेत ते शिशिर धारकर यांनी पहिले द्यावे आणि नंतरच बॅकेंबाबत बोलावे. मात्र खोटे असून २३ सप्टेंबर २०१० ला अर्बन बँक बंद झाली. मात्र त्या अगोदरच १७ सप्टेंबरला १ लाख ४३ हजार, १९ सप्टेंबरला ५ हजार, २६ आणि २७ ला एक एक हजार काढले आहेत. आता त्यांच्या खात्यात १ हजार ९६५ रुपये आहेत. त्यामुळे रवि पाटीलांच्या माणसांना याबाबतची अगोदरच कूणकूण लागली होती. त्यामुळे यांचेच हात बँक बुडविण्यात असू शकते, असाही आरोप शिशिर धारकर यांनी यावेळी केला.