रायगड -पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागील अनेक दशकांपासून सुटत नसल्याने आज पुन्हा एकदा या भागातील जनतेने शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. या आंदोलनात प्रामुख्याने महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. 31 मार्च 2022 पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी पुन्हा आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
शेकापचे भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन -
अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने तत्कालीन आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 2017 मध्ये पेण ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही राजकारण न आणता व खारेपाटातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी 29 कोटी 36 लाख रुपये मंजूर करून काम सुद्धा सुरू करण्यात आले होते. मात्र, या योजनेचे काम 4 वर्षे पूर्ण होऊनदेखील पूर्ण होत नसल्याने आणि ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे या कामाला गती मिळत नसल्याने हे कामच ठप्प झाले होते. त्यामुळे हा प्रश्न असाच प्रलंबित राहिल्याने आजही हा भाग पिण्याच्या पाण्यापासून वंचितच राहिला आहे. म्हणूनच या भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरूपी उतरावा यासाठी आज पुन्हा एकदा शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.