पनवेल -ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला पनवेलमध्ये गळती लागली आहे. कामोठे येथील शेकापचे वजनदार नेते के. के. म्हात्रे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले आहे. शेकाप पक्षात मान सन्मान दिला जात नाही म्हणून नाराज झालेल्याने म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर के.के. म्हात्रे यांच्या या पक्षप्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकाप सोबतच राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.
के.के. म्हात्रे हे पनवेलमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी शेकाप पक्षाच्या माध्यमातून पनवेलच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत ते शेकाप कडून उभे देखील राहिले होते. मात्र, यात त्यांना १५०० मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. महापालिका निवडणुकीत झालेला हा पराभव त्यांनी स्वीकारला. मात्र, स्वीकृत नगरसेवक म्हणून शेकाप पक्षाने त्यांना कधी विचारात घेतले नाही. याची सल त्यांच्या मनात होती. त्यांनतर काही काळ ते शेकापपासून दुरावलेले दिसून आले.