रायगड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्वतःच्या पक्षातील लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांना उन्हा पावसात प्रचाराची वेळ आली आहे. भाजप शिवसेना पक्षावर टीका करताना भाजपला पाठिंबा कसा दिलात, असा सवाल विचारत स्वतःच्या पक्षातील नेत्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याची सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. श्रीवर्धन आणि महाड मध्ये भगवा फडकविण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भरत गोगावले यांची प्रचार सभा माणगाव येथे द.ग. तटकरे विद्यालय मैदानावर घेण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभेला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर व काँग्रेस आघाडीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत झाली असून पक्षाच्या लोकांवर विश्वास राहिला नसल्याने शरद पवार उन्हा, पावसात प्रचार करत आहेत. ज्या लोकांसाठी पवार प्रचार करीत आहेत. ते उद्या त्यांच्याबरोबर राहतील का, असा सवालही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात केला आहे.
शिवसेना भाजपचे सरकार आल्यानंतर हेच निवडून येणारे आमदार पक्ष बदलतील, असा टोला देखील ठाकरे यांनी लगावला. शिवसेना भाजप सरकारवर टीका करीत आहेत. मात्र स्वतःच्या पक्षातील नेते भ्रष्टाचारमध्ये अटकले असून प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. त्यांचा थेट देशद्रोह्यांशी संबंध येत आहे. शिवसेना भाजप सरकार आले तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनीच भाजपला पाठिंबा दिला होता, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाषणातून उपस्थित केला आहे.