रायगड - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. शासनाने पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करण्याच्या भाविकांना सूचना केल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील सागाव गावातील पेशाने शिक्षक असलेले संतोष थळे हे गेल्या 17 वर्षांपासून कागदाच्या आकर्षक गणेश मूर्ती बनवत आहेत. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मुंबई-पुणे येथून आलेली मागणी रद्द झाली आहेत. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
पूर्वी गणेशाच्या मूर्ती शाडू मातीपासून बनवल्या जात. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्तींना मागणी वाढू लागली. मात्र, केंद्र शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणल्याने पुन्हा शाडूमाती आणि इतर पर्यावरण पूरक वस्तूंपासून गणेश मूर्ती बनवण्यास प्राधान्य मिळत आहे. सागाव येथील संतोष थळे यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा छंद आहे. 2003 पासून त्यांनी कागदापासून शोपीस, पपेट बनवण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांना गणेश मूर्ती तयार करण्याची संकल्पना सूचली. गणपतीच्या साच्यामध्ये कागदाला खळ लावून कागद बसवून गणपतीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात. त्यानंतर या मूर्तींना पर्यावरणपूरक जलरंग देऊन रंगरंगोटी केली जाते.