रायगड - आज शाळांची घंटा वाजण्याचा मुहूर्त जिल्ह्यातील अनेक ठिकाणी टळला, तर काही ठिकाणी कोरोना नियम पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळेचे वर्ग भरले न गेल्याने आठ महिन्यानंतर वाजणारी घंटा वाजली नाही. तर अलिबागमधील दत्ताजी खानविलकर शाळेसह जिल्ह्यातील काही शाळा आज सुरक्षित अंतर पाळून सुरू झाल्या आहेत.
शिक्षकांची कोविड तपासणी अद्यापही अपूर्ण
रायगड जिल्ह्यात नववी ते बारावीचे 9 हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांची कोविड तपासणी सध्या सुरू आहे. अलिबाग येथे आरटीपीसीआर तपासणी केंद्र आहे. या ठिकाणी रोज दीडशे ते साडेतीनशे व्यक्तीची कोविड तपासणी केली जाते. त्यामुळे नऊ हजार शिक्षकांची तपासणी करून त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
पालकांची संमती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी घेऊनच शाळेत प्रवेश
शिक्षकांची कोविड तपासणी केली जात असताना शाळेत पाठविणाऱ्या पाल्याच्या पालकांची संमती पत्र गरजेचे आहे. तसेच काही खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पत्रही घेतले आहेत. ते असेल तरच शाळेत प्रवेश दिला जात आहे. अलिबागमधील दत्ताजी खानविलकर शाळेमध्ये संमतीपत्र आणि आरोग्य तपासणी करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.